भास्करगिरी महाराजांना मातृशोक
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरुबाई ज्ञानदेव पिसोडे पाटील (वय ९९) यांचे रविवार (१२ एप्रिल) सकाळी निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी श्रीक्षेत्र देवगड संस्थान परिसरात रविवारी दुपारी साडेचार वाजता होणार आहे.
सरूबाई यांच्या पश्चात दोन मुले ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज व मधुकर पेसोडे तसेच कन्या कमलबाई रायपुरे असा परिवार आहे.
सरूबाई पाटील या भक्तीमार्गातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व मानल्या जात. त्यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची मूल्ये जोपासली. महाराजांच्या घडणीत आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात मातोश्रींच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे.
देवगड संस्थानामध्ये होणाऱ्या ‘दत्तजन्मोत्सव’ सोहळ्यात त्यांना मुख्य मानाचे स्थान असते. दत्तजन्माचा पाळणा हलवण्याचा मान परंपरेनुसार त्यांच्याकडे असे.
महंत भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री असूनही, त्या अत्यंत साध्या राहणीमानासाठी ओळखल्या जात. देवगडच्या धार्मिक कार्यात त्या नेहमीच पडद्यामागून सक्रिय असत. देवगडला येणारे हजारो भक्त महाराजांइतकाच आदर मातोश्रींनाही देत. त्यांना ‘देवगडची माउली’ म्हणूनही आदराने संबोधले जाते.


