नगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी खासदार लंके आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरातच होणार अन्यथा संघर्ष – खा. निलेश लंके
अहिल्यानगर : केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय नगर शहरातच व्हावे, यासाठी महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगर शहर उपेक्षित राहू नये यासाठी, वैद्यकीय महाविद्यालय शिर्डी येथे हलवले गेले तर आपण उपोषणास बसू, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. आज नगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत लंके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नगर शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून येथे वैद्यकीय शिक्षण व उपचारासाठीची संपूर्ण पायाभूत सुविधा आहे. जिल्हा रुग्णालय, दळणवळणाची सुलभता आणि केंद्रस्थानी असलेले स्थान यामुळे वैद्यकीय महाविद्यालय येथेच व्हायला हवे.
यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डीला विरोध, विखेंना सूचक टोला लंके यांनी शिर्डी येथे मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी सुरू असलेल्या हालचालींवर नाराजी व्यक्त करत, सत्तेचा गैरवापर करून प्रकल्प दुसऱ्या तालुक्यात वळवण्याचा प्रयत्न चालू असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता, सूचक इशारा देत म्हटले की, हे प्रकल्प स्थानिक जनतेच्या गरजांनुसार असले पाहिजेत, व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे.
नगर शहरातील उपलब्ध जागांची माहिती, नगर शहरालगत असलेल्या विविध शासकीय जागांचा उल्लेख करत लंके म्हणाले, इंद्रायणी हॉटेलच्या शेजारी सुमारे २५ एकर, विळद येथे कृषी विभागाची ४० एकर जागा, तसेच आरणगाव येथील माजी टीबी सेंटरची जागा – अशा अनेक जागा या प्रकल्पासाठी उपयुक्त ठरू शकतात. या सर्व जागांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दक्षिण भाग उपेक्षित – पदाधिकाऱ्यांची इच्छाशक्ती अपुरी लंके यांनी यावेळी दक्षिण भागातील राजकीय नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केली. विविध प्रकल्प व योजना इतर भागात वळवल्या जातात, कारण दक्षिण भागातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकात्मता आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
जिल्हा विभाजनाची गरज अधोरेखित अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा असल्याने प्रशासकीय नियोजनासाठी जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असल्याचे लंके यांनी स्पष्टपणे मांडले. दोन जिल्ह्यांमध्ये विभाजन झाल्यास प्रशासन अधिक प्रभावी होईल, असेही त्यांनी नमूद केले. ढवळपुरी येथील शेळी-मेंढी पालन प्रकल्प देखील उत्तर भागात हलवण्याचा प्रकार अलीकडे घडला असून, तोही अन्यायकारक असल्याचे लंके यांनी सांगितले. या बाबतीत देखील आपण आवाज उठवणार आहोत, असे ठाम वक्तव्य त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांना पत्र, केंद्रीय समितीला प्रस्ताव नगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले जाणार असून, केंद्र सरकारच्या समितीला सुद्धा योग्य प्रस्ताव सादर केला जाईल, असे लंके यांनी स्पष्ट केले. खासदार निलेश लंके यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात घेतलेली ही आक्रमक भूमिका, नगर शहराच्या विकासासाठी एक निर्णायक पाऊल ठरू शकते.


