Saturday, February 21, 2026

नगर–मनमाड महामार्ग विकासकामांसाठी ४.६८ कोटींचा निधी; खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर बायपास व नगर–मनमाड महामार्ग विकासकामांसाठी ४.६८ कोटींचा निधी

खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला यश

महामार्ग विकासाला मिळणार गती

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अहिल्यानगर बायपासवरील पूरप्रवण भागातील सुधारणा, पूरनियंत्रण तसेच सुविधा विकासासाठी तब्बल ४.६८ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

खासदार लंके यांनी सांगितले की, “ही मंजुरी केवळ निधीपुरती मर्यादित नाही, तर गेल्या अनेक महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे हे फलित आहे. दिल्लीतील मंत्रालयीन चर्चेनंतर अखेर ही कामे मंजूर झाली असून, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.”राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाकडून ७ नोव्हेंबर रोजी जारी आदेशानुसार पुढील प्रमुख कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यात सारोळाबद्दी येथे सर्व्हिस रोड व आरसीसी गटार बांधकाम, नारायणडोह, नेप्ती (कल्याण जंक्शन) व पुणे जंक्शन परिसरात आरसीसी गटार कामे, आरणगाव येथे पथदिव्यांची उभारणी, मांडळी–नागमठाण व देहेरे येथील बोगद्यांचे बांधकाम व दुरुस्ती यांचा समावेश आहे.
ही सर्व कामे पुढील १५ ते ३० दिवसांत सुरू होणार असून, संबंधित कंत्राटदार व प्रकल्प संचालक कार्यालयाला यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर–मनमाड महामार्ग कामांना वेग

कुंभमेळा २०२७ लक्षात घेता नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्ग (रा.मा. १६०) या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील कामांना गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प मिश्र वार्षिक पद्धत या तत्त्वावर राबविला जात असून, एप्रिल २०२७ पर्यंत पूर्णत्वाचा करार असला तरी डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. “या महामार्गाच्या कामासाठी मी स्वतः ११ जुलै २०२५ रोजी बेमुदत आंदोलन केले होते. त्यानंतर केंद्र सरकार व एनएचएआय प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली,” असे खासदार लंके यांनी सांगितले.

विविध टप्प्यांवर वेगवान काम

सध्या विविध टप्प्यांवर जलद गतीने काम सुरू आहे. त्यात राहुरी ते राहुरी फॅक्टरी विभागातील एक बाजूचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. कोल्हार – बाबळेश्वर विभाग डांबरीकरणासाठी तयार आहे तर शनिशिंगणापूर फाटा ते विळद बायपास विभागात प्रत्यक्ष काम सुरू असून, प्रकल्प नियोजनाप्रमाणे पुढे सरकत आहे असे खा. लंके म्हणाले.

आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची किल्ली

खासदार लंके म्हणाले, “अहिल्यानगर व परिसरातील महामार्ग विकास ही केवळ वाहतूक सुलभतेची बाब नाही, तर ती प्रदेशाच्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाची किल्ली आहे. पूरप्रवण भागातील सुधारणा, सर्व्हिस रोड, गटार व्यवस्था आणि पथदिव्यांची उभारणी यामुळे नागरी जनतेला मोठा दिलासा मिळेल. कुंभमेळा २०२७ पूर्वी हे सर्व काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles