सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी दुपारी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींवरून आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी टीका केली आहे. “तिथे अनेक निमंत्रित होते. सिने कलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतले मान्यवर होते. त्यातल्या काही लोकांना पाहिल्यावर आम्हाला धक्का बसला. भाजपा व संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल आम्हाला धक्का बसला. किती ढोंग आणि पाखंड आहे? आम्ही पाहिलं की गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करतोय. सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना हे माहिती नसावं की सरसंघचालकांच्या बाजूला बसलेल्या अनेक व्यक्ती देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झालेल्या आहेत”, असा दावा संजय राऊतांनी केला.
पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी गायक अदनान सामी यांच्या वडिलांचा उल्लेख केला. “अदनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होते. १९६५ च्या युद्धात अर्शद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठणाकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान सामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देत आहात? कोणत्या इतिहासाचे धडे देत आहात? बाजूला एक नटी होती. ती म्हणाली ‘आय लव्ह भागवत. मला भागवत फार आवडतात’. तिच्यावर आर्थिक गैरव्यवहाराबाबत लुकआऊट नोटीस आहे. तिचा नवरा लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती बनवल्याप्रकरणी तुरुंगात होता. ही काय प्रेरणा आहे?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.


