सोमवारी सकाळी भाजप आणि शिंदे गटाचे नगरसेवक गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत जमले होते. यावेळी राज ठाकरे ( यांची मनसे (MNS) ही भाजपला पाठिंबा देणार असल्याची आवई उठली होती. हा सगळा प्रकार सुरु असताना राज ठाकरे हे एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पराभूत नगरसेवकांसोबत बैठकीत होते. राज ठाकरे आणि भाजपच्या (BJP) मुंबईतील संभाव्य युतीची माहिती बाहेर येताच राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र, बैठक संपवून बाहेर पडताच राज ठाकरे यांनी या वृत्ताचा इन्कार केला. आम्ही मुंबईत भाजपसोबत जाणार नाही, मी सांगतोय ना, नाही म्हणजे नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
सकाळी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसेची नियोजित बैठक होती. या बैठकीला मुंबईतील मनसेचे सर्व पराभूत उमेदवार, विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हजर होते.
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांच्या मनसेने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. यावरुन मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. निवडणुकीच्या प्रचारात ज्यांच्यावर सडकून टीका केली, त्यांच्यासोबतच निवडणुकीनंतर मांडीला मांडी लावून बसल्यामुळे मनसेवर अनेकांनी टीकास्त्र डागले होते. याचदरम्यान राज ठाकरे यांनी लवचिक राजकीय धोरणाबाबत भाष्य केले. माझे हे लवचिक राजकीय धोरण वैयक्तिक हितासाठी नव्हे तर मनसेच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी असेल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.


