Thursday, February 19, 2026

नगर तालुक्यात व्यावसायिकाची हत्या; गुन्हा दाखल

​अहिल्यानगर-हॉटेलमधील काचेचे फर्निचर फोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून आरणगाव येथील एका व्यावसायिकाला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत जखमी झालेल्या मिठु कार्तिक दत्त यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेली माहिती अशी की, कोमल फरसान मार्ट आणि हॉटेलचे मालक भाऊसाहेब विश्वनाथ नांगरे व जावेद छोटू आतार (दोघे रा. वाळकी) यांच्याशी मयत मिठु दत्त यांचा फर्निचरच्या नुकसानीवरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी भाऊसाहेब नांगरे, जावेद आतार आणि त्यांच्या हॉटेलमधील तीन कामगारांनी मिळून ६ मार्च २०२५ रोजी आरणगाव येथील ‘अजय फॅब्रिकेशन’ दुकानात घुसून दत्त यांना लाथाबुक्क्यांनी व शस्त्राने गंभीर मारहाण केली.

​या हल्ल्यानंतर जखमी दत्त यांना तातडीने उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, १७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २३ मार्च रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी केला असून, त्यांच्या फिर्यादीवरून पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

अहिल्यानगरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; २१ जणांना अटक, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
​अहिल्यानगर: शहरातील बागडपट्टी भागातील ढोणे गल्लीत सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळणाऱ्या २१ जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण ४ लाख ९३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​पोलीस कॉन्स्टेबल विशाल संतोष कुलकर्णी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक गडकरी आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास एका जुन्या वाड्याच्या भिंतीच्या आडोशाला छापा टाकला. यावेळी दोन गोलाकार घोळक्यांमध्ये बसून आरोपी जुगार खेळत होते.

​पोलिसांनी या कारवाईत संजीव रामचंद्र राऊत, अमर रुपा छाडेकर, राहुल प्रकाश भट, यशवंत पंढरीनाथ ढोणे, हेमंत गणेश गायकवाड, समाधान श्रीमंत सुरवसे, जिजाबा रखमाजी भोसले, अशोक विश्वनाथ चोभे, विशाल रमेश कानडे, प्रेमशंकर गणेशलाल कश्यप, मोहन दत्तु गोरे, सतीश परशराम जेजुरकर, अशोक बबन घोगरे, तुषार अशोक लड्डा, सूरज अशोक यादव, श्रीमंत निवृत्ती सुरवसे, जिशान खान मंजूरखान पठाण, अमोल महादेव कांबळे, राजू रामदास जगताप आणि रिंटू नंदेलाल महातो यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातून महागडे मोबाईल संच आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles