अहिल्यानगर -शहरातल्या शेलार मळा रस्त्यावरील व्हिडीओकॉन परिसरात एका महाविद्यालयीन युवकावर चाकू आणि लोखंडी फायटरने हल्ला करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (14 ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये रेहान गालीब खान (वय 19 रा. बुर्हाणनगर, ता. अहिल्यानगर) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी रेहान खान याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी (15 ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान रफीक शेख, अभि गोरख धाडगे (दोघे रा. कापुरवाडी, ता. अहिल्यानगर) आणि हर्षवर्धन तापकिरे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. बुर्हाणनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेहान खान हा मंगळवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्याचा मित्रासोबत दुचाकीवरून नागरदेवळे येथील तालमीकडे व्यायामासाठी जात होता. शेलार मळा येथील व्हिडीओकॉन कॉर्नर जवळ समोरून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांची दुचाकी थांबवली. ‘आमच्याकडे पाहून थुंकतो काय?’ असे म्हणत हर्षवर्धन तापकिरे याने रेहानसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. यानंतर, ‘हा खूप माजला आहे, याने पूर्वी माझ्यावर केस केली होती, आज याला जिवंत मारून टाका’, असे म्हणत सलमान शेखने इतरांना चिथावले.
त्यानंतर तिघांनी रेहानला मारहाण करण्यास सुरूवात केली. सलमान शेखने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून रेहानच्या डोक्यात वार केला, तर अभि धाडगे याने हातातील लोखंडी फायटरने तोंडावर जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सुमारे तीन महिन्यांपूर्वी रेहानचे सलमान शेखसोबत भांडण झाले होते आणि त्यावेळी रेहानने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. याच रागातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


