नगर: शहरातील पटवर्धन चौकातील एक धार्मिक वास्तू समाजकंटकांनी मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने पाडल्याने रविवारी शहरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ जेसीबीसह काही संशयितांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकरणातील समाजकंटकांवर कारवाईसाठी मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. कारवाई न झाल्यास ‘रास्ता रोको’चा इशारा देण्यात आला
एसपी कार्यालयावर मोर्चा
धार्मिक वास्तू पाडणार्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. निवेदनात म्हटले आहे, की अज्ञात लोकांनी धार्मिक वास्तू पाडली, यात पेट्रोलिंग करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे दिसते.
कोतवाली पोलिस स्टेशन ते आनंद बाजार या 5 मिनिटांच्या अंतरावर असताना पोलिस प्रशासनाने याकडे का दुर्लक्ष केले, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जेसीबी कोठून निघाला व कोणत्या ठिकाणी थांबला, जातीवादी संघटनेच्या कोण व्यक्ती त्यांच्या संपर्कात होते व त्यांना कोणाचे पाठबळ आहे, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षकांकडून शातंतेचे आवाहन
घटनेनंतर दोन समाजात तणाव वाढू नये यासाठी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी, अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन समाजमाध्यमांतून केले. पोलिस प्रशासनालाही घटनेतील गुन्हेगारांवर कारवाईच्या सूचना केल्या. पोलिसांनी तोडफोड प्रकरणात काही संशयितांसह एक जेसीबीही ताब्यात घेतला असून त्यानंतर तणाव निवळला.


