शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
मुस्लिम महिला व पैगंबराबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी
समाजकंटकाला अटक करण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्याबाबत अपशब्द व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम महिलांनी शुक्रवारी (दि.19 सप्टेंबर) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. भर पावसात निघालेल्या या मोर्चात शहरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मुस्लिम महिला व मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आपेक्षार्ह टिप्पणी करुन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या राजेंद्र भंडारी यास तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली. कोठला येथून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. महिलांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे आय लव्ह मोहम्मद या नावाचे बॅनर झळकवून जोरदार घोषणाबाजी केली.
निवेदनात म्हंटले आहे की, राजेंद्र भंडारी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर (स.अ.व.) यांच्याबद्दल अपशब्द वापरून अत्यंत गंभीर प्रकार केला आहे. त्याने मुस्लिम महिलांबादल अपमानास्पद शब्द वापरले असून, त्यामुळे महिला वर्गाचा व समाजाचा अपमान झाला आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सदरील प्रकरण गंभीर असून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ राजेंद्र भंडारी यास अटक करावी. वारंवार मुस्लिम समाजाला संघटितपणे समाजकंटक टार्गेट करुन धार्मिक भावना दुखावत असून, त्यांच्यावर मोक्का कारवाई करावी. अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण वक्तव्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घ्यावी. जर या प्रकरणात त्वरीत कारवाई करण्यात आली नाही, तर समस्त मुस्लिम महिला समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
- Advertisement -


