छ.शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप खासदाराची जीभ हसडणाऱ्याला १,००,००० चे बक्षीस
प्रतिनिधी : भाजप खा. प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर तुलना केली आहे. संसदेत बोलत असताना त्यांनी ही तुलना केली आहे. अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी खा. पुरोहित यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुरोहित यांचा निषेध करत त्यांची जीभ हसडणाऱ्याला काळे यांनी अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
खा. पुरोहित यांच्या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सर्व स्तरातून पुरोहित यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे. किरण काळे म्हणाले की, पुरोहित हे भाजपचे पोपट आहेत. ओडिसात जन्म झालेल्या पुरोहितांना महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल कल्पना नाही. केवळ अकरावी शिक्षण झालेले पुरोहित यांना इतिहास माहीत नाही. ते अखंड हिंदुस्तानाच दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं वक्तव्य करत शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत. हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी शहर शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो.
काळे पुढे म्हणाले, हे महाराष्ट्राच्या मातीचे भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या मातीत झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी कान्होजी जेथे, बाजी पासलकर, नेताजी मालुसरे, येसाजी कंक यासारख्या मोजक्या मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या रामेश्वर मंदिरामध्ये अन्याय, अत्याचारा विरुद्ध लढण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा आभाळा एवढं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या महाराजांचा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही.
आधी राहुल सोलापूरकर, मग कोरटकर आपल्या महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य करतात. नंतर घुमजाव करत माफी मागतात. वाचाळवीर मंत्री निलेश राणे खोट बोलून महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतात. हे महाराष्ट्रा विरुद्ध षड्यंत्र आहे. महाराष्ट्रने हे वेळीच रोखण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे आहेत की जे वारशाने नव्हे तर कर्तुत्वाने राजे झालेले आहेत. अशा आमच्या महाराजांचा अपमान आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.


