Sunday, February 22, 2026

सरपंचपदाची निवडणूक लढवण्यात तीन मुलांचा अडथळा, बापाने चिमुकल्या लेकीला कॅनॉलमध्ये फेकून संपवलं

सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी नांदेडमध्ये एका जन्मदात्या पित्याने आपल्या सात वर्षाच्या मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मात्र, आरोपीला तीन अपत्य आहेत. त्याला गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात तीन किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे. निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरु आहे. दरम्यान या घटनेने परिसर हादरून गेला आहे. पांडुरंग कोंडामंगले (वय 32) अस आरोपी पित्याचे नाव आहे.आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱ्हाळी येथे हेअर कटिंगचे दुकान असून त्याला तीन मुलं आहेत. तीन दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून सात वर्षाची चिमुकली प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परत आला. इकडे कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. पुढील चौकशीत संशय बळावल्याने 30 जानेवारी रोजी तेलंगणा पोलिसांनी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना ताब्यात घेतले आणि अटक केली. या घटनेनेनंतर विविध चर्चेला उधाण आले आहे. आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याच बोलले जात आहे. तर दुसरीकडे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी असल्याची चर्चा होती. पण तीन मुलं असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा देखील सुरु आहे. हत्येच नेमकं कारण काय याचा तपास पोलीस करत आहे. मात्र, या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. आता पोलिसांच्या चौकशीतून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles