आजकाल प्रत्येकजण आपापल्या मुलांना प्रतिष्ठित शाळांमध्ये दाखल करत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमीकमी होत आहेत. खासगी शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याची स्पर्धा सुरु असताना एक महिला जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये दाखल केले आहे.नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी त्यांच्या दोन्ही जुळ्या मुलांना सरकारी अंगणवाडीत दाखल केले आहे. शहरातील उच्च दर्जाच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश घेण्याऐवजी आपल्या मुलांना सरकारी अंगणवाडीमध्ये त्यांनी दाखल करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलांना शाळेत सोडायला जातानाचा मिताली सेठ यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंगणवाडीच्या चांगल्या दर्जाच्या सेवा आणि सेविकांचे मुलांच्या प्रति असलेले प्रेम पाहून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठ यांनी आपल्या ३ वर्षांच्या जुळ्या मुलांना सबर आणि शुकर यांना टोकरतलाव येथील अंगणवाडीत दाखल केले आहे. या निर्णयामागे सामाजिक जाणीव असून, मुलांना अंगणवाडीत दाखल केल्यामुळे तिथल्या सुविधांमध्ये सुधारणा होईल आणि त्याचा फायदा इतर मुलांनाही मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
अंगणवाडीत चांगल्या सेवा देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला आता विशेष लक्ष द्यावे लागेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नंदुरबारमधील अंगणवाड्यांना एक नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अन्य पालकांनीही सरकारी शाळांना प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कृतीतून म्हटले आहे.


