मंत्री नरहळी झिरवाळ यांचा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शासकीय विश्रामगृहात मद्यपान आणि तृतीयपंथी सोबत असलेल्या व्हिडिओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत सापडले आहेत. या प्रकारामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री झिरवाळ यांची तत्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्री झिरवाळ यांच्या वादग्रस्त व्हिडिओवर सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. माजी आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘भोंदूबाबाबरोबर काही लोकांचं धार्मिक कनेक्शन उघड झालं. त्यानंतर सहा-सात महिन्यांपूर्वी काढून ठेवलेला नरहरी झिरवळ यांचा व्हिडीओ आता अचानक कसा बाहेर आणला गेला? राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा वहिनींची निवड व्हावी ही इच्छा व्यक्त करणारी पहिली व्यक्ती म्हणजे नरहरी झिरवळ’
‘सुनेत्रा पवार अध्यक्ष व्हाव्यात, ही इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये ACB चा ट्रॅप लावणे आणि नंतर आता हा व्हिडीओ सात महिन्यापूर्वी काढून मीडियाला सोपवणे. एका सरळ माणसाला बदनाम करायचं. त्यानंतर मीडिया ट्रायल..हे झारीतील शुक्राचार्य कोण? अशोक खरात प्रकरण अंगलट येतय. त्यामुळे स्वतःवरील लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रकार असून हे वंगाळ राजकारण लक्षात येतंय. सोमवती अमावस्या ते अघोरी पूजा या मागे २ सप्टेंबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६, असे अमोल मिटकरी म्हणाले.


