प्रतिष्ठेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या तथाकथित पत्रकार आणि कन्सल्टंट रवींद्र नारायण एरंडे (वय 63) याच्या पाशात अडकलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली अटकेत असलेल्या एरंडेच्या पोलीस कोठडीत नाशिक सत्र न्यायालयाने 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयव जप्त करण्यात आल्याने, या प्रकरणात आता ‘भोंदूगिरी’चा अँगलही स्पष्ट झाला आहे.
अशोक खरातप्रमाणेच एरंडेने देखील महिलांना विविध आमिषे दाखवून भोंदूगिरी केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्या सातपूर येथील कार्यालयाची झाडाझडती घेतली असता, तिथे सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवडी यांसारख्या संशयास्पद वस्तू आढळल्या. या वस्तूंचा वापर तो महिलांना घाबरवण्यासाठी किंवा वश करण्यासाठी करत होता का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. याशिवाय त्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.स्वतःचे पाप लपवण्यासाठी एरंडेने सुरुवातीला काही जणांनी 12 लाखांची खंडणी मागितल्याचा बनाव रचला होता. मात्र, त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडी आणि पेनड्राइव्हमध्ये 100 हून अधिक आक्षेपार्ह फोटो आणि अश्लील व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या धक्कादायक पुराव्यांनंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान एरंडेच्या जाळ्यात अडकलेल्या 8 महिलांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर अनेक पीडितांनी पुढे येऊन माहिती दिली आहे. नोकरीचे आमिष दाखवून किंवा इतर फसवणुकीद्वारे त्याने या महिलांची पिळवणूक केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलीस सध्या अत्यंत गोपनीय पद्धतीने या महिलांचे प्रबोधन करत असून त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.रवींद्र एरंडे हा सातपूर भागात स्वतःला मोठा पत्रकार आणि समाजसेवक म्हणवून घेत असे. राजकीय मंडळींसोबतचा वावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मिळालेले सन्मान यामुळे त्याची समाजात एक ‘प्रतिष्ठित’ प्रतिमा होती. सावरकरनगर येथील महापालिकेच्या अभ्यासिकेवर कब्जा मिळवणे असो किंवा ग्रीन जिमचा ताबा, एरंडेचा परिसरात मोठा दरारा होता. मात्र, आता त्याच्या या सन्माननीय प्रतिमेमागचे काळे वास्तव समोर आल्याने सातपूर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.


