भोंदू बाबा अशोक खरातच्या कारनामांचा अद्याप पुरता छडा लागलेला नसताना आणि या खरातच्या फाइल्समध्ये एक ना अनेक राजकारणी सापडत असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक सेक्स स्कँडल उघडकीस आले आहे. एका ब्लॅकमेल प्रकरणात जप्त केलेल्या टॅबमधून 100 हून अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ हाती लागले आणि पोलिसांकडे न्याय मागणारा फिर्यादी रवींद्र गणपत एरंडे हाच मुख्य आरोपी निघाला. त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात 2 एप्रिल 2026 रोजी या प्रकरणी 63 वर्षीय रवींद्र एरंडे यानेच फिर्याद दाखल केली. एरंडेच्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयातील टॅब चोरीला गेला होता. त्या टॅबमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे अनेक फोटो व्हिडिओ होते.
टॅब पळवणाऱ्या आरोपीनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितली, असे त्याचे म्हणणे होते. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून 10 हजार रुपये स्वीकारताना चार संशयितांना रंगेहाथ पकडले. या आरोपीमध्ये आकाश पुंडलीक बकरे (28) प्रकाश रामदास पानपाटील (25), सूरज सुनील गवई (27) आणि श्रीपत भीमराव शिंदे (38) यांचा समावेश आहे. हे सर्व सातपूर परिसरातील रहिवासी असून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून संबंधित टॅब जप्त केला. त्यामधील डेटा तपासण्यात आला असता सुमारे १०० हून अधिक अश्लील आणि वैयक्तिक व्हिडिओ हाती लागले. खरात प्रकरणाचीच ही पुनरावृत्ती असल्याने नाशकात पुन्हा एकदा खळबळ उडाली.
आरोपींकडून चार मोबाईल, दोन पेनड्राईव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. त्यामधील डेटा तपासला असता ज्याने फिर्याद दिली त्या रविंद्र गणपत एरंडेचे विविध महिलांसोबतचे तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स त्यात आढळून आल्या. याच दरम्यान, एका पीडित महिलेने सातपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधून रविंद्र एरंडे विरोधात स्वतंत्र तक्रार दाखल केली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तसेच ती अनुसूचित जातीची असल्याचे माहीत असूनही तिचा गैरफायदा घेत, नाशिक आणि इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे. या तक्रारीनुसार लैंगिक शोषण आयटी अॅक्ट व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून एरंडे यास अटक करण्यात आली.
भोंदू अशोक खरातचे कारनामे लक्षात घेत पोलिसांनी या प्रकणातही आता पोलीस अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत नंबरच हेल्पलाईन म्हणून जाहीर केले असून, महिलाना तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. टॅब आणि पेन ड्राईव्हमधील व्हिडीओ पाहता या एरंडेने शोषण केलेल्या महिलांची संख्या शंभरच्या पुढे जाण्याची भीती आहे.


