नाशिकमध्ये जीएसटी कारवाईचा तपास लवकर पूर्ण करण्यासाठी लाच घेताना राज्यकर उपायुक्त आणि सहाय्यक राज्य कर आयुक्त यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जीएसटी विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ दत्तू पागे, मच्छिंद्र विठ्ठल दोंदे, अमित हिरामण जाधव अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचे नाशिकमध्ये दामोदर चौक भागात कार्यालय आहे. या ठिकाणी संशयित अधिकाऱ्यांनी जीएसटी कारवाई केली होती. या कार्यालयातील तपास लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य कर उपायुक्त पागे व सहायक राज्यकर आयुक्त दोंदे यांनी एक कोटी २५ लाख रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडे तक्रार केली. तडजोडीअंती निश्चित झालेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपयांची लाच मागितली. त्यानुसार मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सापळा रचला. पाथर्डी फाटास्थित वस्तू व विक्री कर कार्यालयात लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून २० लाख रुपये पागे व दोंदे यांच्यावतीने खासगी व्यक्ती अमित जाधव याने स्वीकारले.
यावेळी पथकाने त्यांना रंगेहात पकडले. नंतर दोन अधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी संशयित राज्यकर उपायुक्त सोमनाथ पागे, सहायक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी व्यक्ती अमित जाधव यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


