देशातील राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर येत्या एक एप्रिलपासून रोख स्वरूपात टोल स्वीकारणे बंद करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. प्रवाशांना फक्त फास्टॅग किंवा ‘यूपीआय’ द्वारेचे टोलची रक्कम भरता येईल.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ‘एनएचएआय’ने म्हटले आहे, की या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर, राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरील सर्व टोल नाक्यांवर केवळ डिजिटल पद्धतींद्वारे, फास्टॅग किंवा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वापरून प्रक्रिया केली जाईल. डिजिटल राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली विकसित असा करण्यासाठी प्राधिकरण एक एप्रिल २०२६पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्ग फी प्लाझावर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा विचार करीत आहे. सध्या ‘एनएचएआय’च्या टोल नाक्यांवर रोख रकमेत टोल भरायचा झाल्यास मूळ शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाते आणि ‘यूपीआय’ द्वारे टोल भरायचा झाल्यास सव्वापट आकारणी केली जाते.
कॅशलेस व्यवहार केल्यामुळे सर्व देशभर राष्ट्रीय महामार्गावर डिजिटल पेमेंट प्रणाली लागू होईल
राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील कोंडी टाळता येईल, वाहनांच्या रांगा थांबतील
प्रवास अधिक सुलभ व गतिमान होईल
टोल व्यवस्था अधिक पारदर्शक व सुटसुटीत होईल, असे ‘एनएचएआय’चे म्हणणे आहे


