राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा काकी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, यासाठी त्यांच्या पक्षातील बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता. मात्र, काही मोजक्या जणांनी या प्रस्तावाला समर्थन देण्यासाठी सह्या केल्या नाहीत. ते पदाधिकारी आणि आमदार कोण, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार म्हणाले, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांशी बोलल्यावर तुम्हाला कळेल. सुनेत्रा काकी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असे नाही. 35 आमदारांनी या प्रस्तावावर सह्या केल्या होत्या, असे आम्हाला कळते. त्या 35 आमदारांपैकी एखाद्याला जाऊन विचारा, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्पष्ट सांगतील. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा काकींसाठीच सह्या केल्या आहेत. ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा. ज्यांनी सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्तावावर सह्या केल्या नाहीत, त्यांनी का केल्या नाहीत आणि ते आमदार किंवा पदाधिकारी कोण आहेत, हा संशोधनाचा विषय असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. येत्या 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड होईल, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी अलीकडेच दिली होती.


