अहिल्यानगर -उपचारादरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा जीव गमवावा लागल्याची फिर्याद रुग्णाच्या पत्नीने शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरून शहरातील सोनांबेकर हॉस्पिटलचे डॉ. अभिजीत भाऊसाहेब कोरडे आणि डॉ. अजिंक्य अशोक सोनांबेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती दत्तात्रय दळवी यांना छातीत दुखू लागल्याने 1 मार्च 2025 रोजी सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील डॉ. अभिजीत कोरडे यांनी रुग्णाला स्टेन टाकण्याचा सल्ला दिला. मात्र, स्टेन टाकल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी हाताला गँगरिंग झाल्याचे सांगण्यात आले. या काळात डॉक्टरांनी कोणत्याही तज्ज्ञ युरोलॉजिस्ट किंवा नेफरोलॉजिस्टचा सल्ला घेतला नाही. उलट रुग्णाच्या नातेवाइकांकडे ‘खूप खर्च येणार आहे, पैशाची व्यवस्था करा,’ असे सांगत पैशांची मागणी केली.
उपचारादरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावल्यानंतर, रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना नाशिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्ण महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत बसतो का याची पाहणी केली असता या योजनेचा मिळणारा सर्व लाभ सोनांबेकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापन समितीने व डॉक्टरने तत्पूर्वीच घेतला होता. त्यामुळे योजनेंतर्गत पतीला लाभ मिळू शकणार नाही व खर्चाचा अंदाज पाहता रुग्णाला नंतर घोटी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
या दोन्ही रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी संवाद साधल्यानंतर, सोनांबेकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाला आहे. किडनीच्या आजारावर वेळीच उपचार न केल्यामुळे रुग्णाला किडनी फेल्युअरचा त्रास झाला आणि 22 मार्च 2025 रोजी उपचारादरम्यान रुग्ण पतीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने केलेल्या चौकशीत सोनांबेकर हॉस्पिटलचे व्यवस्थापन आणि डॉ. अभिजीत कोरडे हे रुग्ण मृत्यूस जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या समितीने रुग्णाच्या उपचारावर झालेला खर्च परत करण्याचे आदेशही हॉस्पिटल व्यवस्थापनाला दिले होते. या सर्व बाबींचा विचार करून, निष्काळजीपणामुळे पतीचा मृत्यू आणि आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक समीर बारवकर तपास करत असून आरोपींवर काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.


