राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही समाधान वाटेल, असे मोठे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून तो शरद पवारांचा परिवार असल्याचे सांगत, राजकीय कालखंडात हा परिवार जर एकसंघ राहिला तर त्याचा आनंदच होईल, असे लंके म्हणाले. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी सुख-दु:खात हे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्र राहिले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा विकास हा शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे झाला असून अजित पवारांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विकासाची कामे केली असल्याचे मत खासदार लंके यांनी व्यक्त केले. त्यामुळे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास हा निर्णय सर्वसामान्य नागरिकही स्वीकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारण हे क्षणाक्षणाला बदलत असते. त्यामुळे कोणतेही ठाम भाकीत करता येत नाही. वाट पाहू आणि बघू, अशी प्रतिक्रिया देत लंके यांनी पुढील काळात राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे संकेत दिले.


