निशांत दिवाळी अंकाने 25 वर्ष वाचकांच्या मनावर राज्य केले – सभापती प्रा. राम शिंदे
निशांत दिवाळी अंकाच्या रौप्य महोत्सवी अंकाचे प्रकाशन
नगर – अहिल्यानगर जिल्ह्यातून अखंडपणे 25 वर्ष विविध विषयांवर प्रकाशित होणार्या निशांत दिवाळी अंकाने वाचकांच्या मनावर राज्य केले असून कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही संपादक निशांत दातीर यांनी महाविद्यालयीन जीवनात सुरु केलेल्या निशांत दिवाळी अंकाचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत असल्याने या वाटचालीचा अनेकांना हेवा वाटतो. राज्यातून अनेक दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रकाशित होणार्या निशांत दिवाळी अंकाने राज्यात आपला वेगळा ठसा उमटवत एक प्रकारे जिल्ह्याची साहित्य क्षेत्रातले प्रतिनिधीत्व केले असल्याची भावना राज्याचे विधानपरिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजपाचे मा. जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, रोहन मांडे, मॅक्सकेअर हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉ. सतिश सोनवणे, शहाजीराजे भोसले, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, एखादा साहित्य संच दिवाळी अंक स्वरुपात सलग 25 वर्ष नाविन्यपूर्ण व आकर्षक मुखपृष्ठासह प्रकाशित करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. निशांत दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा अनेक वर्षांपासून मला योग लाभला आहे. ग्रामीण भागातील एखाद्या तरुणाने सुरु केलेल्या रोपटयाचे मोठ्या वृक्षात पदार्पण होत असल्याची भावना या अंकाच्या 25 वर्षाच्या वाटचालीवर व्यक्त केली तरी वावगे ठरणार नाही.
यावेळी संपादक निशांत दातीर म्हणाले की, निशांत दिवाळी अंकाच्या रौप्य महोत्सवी विशेषांकात नवतंत्रज्ञान आणि दर्जेदार सर्वस्पर्शी शिक्षण या परिसंवादात प्रसिध्द माहिती तंत्रज्ञान तज्ञ दिपक शिकारपूर, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ रेणु गावस्कर, रमेश पानसे, वरुण भालेराव, शमसुद्दीन तांबोळी, मा.पो.महासंचालक प्रविण दिक्षीत, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, अॅड. शाम असावा, नाशिक विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सुनील कडासने आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच माध्यमांपुढेच अभिव्यक्तीचे आव्हान या परिसंवादात ज्येष्ठ संपादक प्रशांत दिक्षीत, विचारवंत अजित अभ्यंकर, वासुदेव कुलकर्णी, अॅड. असीम सरोदे, भरत दाभोलकर आदी मान्यवरांचा समावेश आहे. तसेच लग्नसंस्था बेजार समस्यांचे जंजाळ या परिसंवादात डॉ. गौरी कानिटकर, हेरंब कुलकर्णी, मदुरा कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी आदी मान्यवरांचे लेख आहेत. या महत्त्वपूर्ण परिसंवादाबरोबरच निशांत दिवाळी अंकाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीच्या प्रवासावर संपादक निशांत दातीर, पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक नागेश शेवाळकर, मुंबई येथील सौ. भारती सावंत तर श्रीरामपूरचे अमोल कोरडे आदींनी आपले अनुभव कथन केले आहेत. आशिष नेनगुणकर, अंजली राठोड, सुनीत तागड, भूषण तांबे, डॉ. सुधा कांकरिया, तुकाराम खिल्लारे, उध्दव भयावळ आदी मान्यवरांचे वाचनीय लेख असून सुप्रसिध्द राशीभविष्य तज्ञ प्रा. रमणलाल शाह यांचे वर्षभराचे भविष्य प्रकाशित करण्यात आले आहे. यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने एकूण 125 रंगीत पृष्ठांचा अंक वाचकांना दिवाळी फराळाच्या सोबत वाचनाची गोडी वाढवणारा असेल. आकर्षक मुखपृष्ठ ज्ञानेश शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले असून अंकाची सजावट बापू बराटे व आतील मजकूराची सजावट पुणे येथील अद्वैत फिचर्स यांनी केली आहे.
निशांत दिवाळी अंकाने 25 वर्ष वाचकांच्या मनावर राज्य केले – सभापती प्रा. राम शिंदे
- Advertisement -


