राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या बंडखोरांसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. गडकरी यांनी जाहीर सभेतून तिकीट वाटपामध्ये काही लोकांवर अन्याय झाला हे मान्य केले. त्याची कारणेही त्यांनी यावेळी सांगितली.
नऊ वर्षानंतर महापालिका निवडणुका होत असल्याने उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या खूप मोठी होती. भाजप सध्या केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. भाजपने काही लोकप्रतिनिधींच्या परिवारातील लोकांनाही उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे बंडखोरही वाढले आहेत.
भाजपने बंडखोरीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना सहकार्य न केल्याने काही माजी नगरसेवकांसह २६ पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. सध्या महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून नागपूरची निवडणूक भाजपने प्रतिष्ठित प्रतिष्ठेची केलेली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचार सभांच्या धडका सुरू केलेला आहे.सोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही रोज सभा घेत आहेत. अशाच एका सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंडखोरासंदर्भात महत्त्वाचे विधान केले. गडकरी म्हणाले की, भाजपची उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक लोक नाराज आहेत. त्यांना असे वाटते की पक्षाने आपल्यावर अन्याय केला. त्यांच्यावर अन्याय झाला ही बाब खरी आहे, हे मान्य आहे. मात्र प्रत्येकाला उमेदवारी देणे शक्य नाही. त्यामुळे काही लोकांना उमेदवारी तर काही लोकांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही पक्षासोबत जो उभा राहतो तोच खरा स्वाभिमानी कार्यकर्ता असतो असेही गडकरी यावेळी म्हणाले.जर एखादी हवाई सुंदरी असेल आणि ती खूप लोकांना हवीशी वाटत असले तरी मिळताना एकालाच मिळेल असे गडकरी गमतीशीरपणे म्हणाले. अन्याय झाले म्हणणाऱ्या लोकांना यापूर्वी नगरसेवक केले, महापौर केले. परंतु, त्यानंतरही ते अन्याय झाला असे म्हणत असतील तर पुन्हा पक्षाने काय द्यावे असा प्रति प्रश्नही गडकरींनी केला.


