Thursday, February 19, 2026

थकीत एफआरपीप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांना नोटीस

अहिल्यानगर-राज्यातील शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची (एफआरपी) सुमारे 60 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिलेल्या राज्यातील 45 साखर कारखान्यांना आता थकीत एफआरपीप्रश्नी रडारवर आले आहेत. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावल्या असून, त्यांची सुनावणी आयुक्तालयात येत्या मंगळवारी आणि बुधवारी (दि. 17 व 18) सलग दोन दिवस ठेवण्यात आल्या आहेत. यात नगर जिल्ह्यातील 9 तर नाशिक जिल्ह्यातील 2 अशा 11 साखर कारखान्यांचा समावेश आहे. यातील चार साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीप्रकरणी आज मंगळवार (दि.17) आणि उर्वरित विरोधात उद्या बुधवार (दि.18) रोजी सुनावणी होणार आहे.

राज्यातील साखर कारखान्यांकडे यंदाच्या 2025-26 च्या हंगामातील दिनांक 31 जानेवारीअखेरच्या ताज्या पंधरवडा अहवालानुसार, शेतकर्‍यांच्या एफआरपीची उसाच्या तोडणी वाहतूक खर्चासह 4 हजार 252 कोटी रुपये रक्कम अद्यापही थकीत आहे. ऊस गाळप हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे झुकला आहे, असे असूनही नोटिसा काढण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये काही कारखान्यांनी एफआरपीची फारच कमी रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. साखर आयुक्तालयातील प्राप्त ताज्या अहवालावरून 2 सहकारी आणि 2 खासगी साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना एफआरपीचा एकही रुपया दिलेलाच नाही. म्हणजे शंभर टक्के रक्कम थकीत ठेवली आहे. हे कारखाने एफआरपीची रक्कम कधी देणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

एफआरपीचे 4 हजार 252 कोटी थकीत
राज्यातील यंदाच्या गाळप हंगाम 2025-26 मध्ये दि.31 जानेवारीअखेरच्या अहवालानुसार (दि. 15 जानेवारी अखेरच्या गाळपाचा 30 जानेवारीअखेर दिलेल्या एफआरपी रकमेनुसारचा अहवाल) उसाच्या एफआरपीची शंभर टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम 41 कारखान्यांनी दिलेली आहे. 80 टक्के ते 99 टक्के रक्कम 75 कारखान्यांनी, 60 टक्के ते 80 टक्के रक्कम 44 कारखान्यांनी तर शून्य ते 60 टक्क्यांपर्यंतची रक्कम 45 कारखान्यांनी दिलेली आहे. यातील शेवटच्या 45 कारखान्यांचे म्हणणे सुनावणीत ऐकून घेऊन कारवाई होणे अपेक्षित आहे. सद्य:स्थितीत एफआरपीचे सुमारे 4 हजार 252 कोटी रुपये अद्यापही थकीत आहेत.

नगर जिल्ह्यातील केदारेश्वर, सोपनराव ढसाळ, स्वामी समर्थ, अगस्ती आणि क्रांती शुगर या पाच साखर कारखान्यांची आज मंगळवारी साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तर उद्या गणेश, जय श्रीराम, वृध्देश्वर आणि अशोक या चार साखर कारखाना यांची उद्या मंगळवार (दि.18) रोजी सुनावणी होणार आहे. यासह नगर विभागात मोडणार्‍या आणि नाशिक जिल्ह्यात असणार्‍या नाशिक ससाका, एस.जे. शुगर्स या साखर कारखान्यांची देखील दोन दिवसात सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान एफआरपी थकीत असणार्‍या साखर कारखाना व्यवस्थापन यांच्याकडून कोणता बचाव करण्यात येतो तर साखर आयुक्त त्यावर काय निर्णय देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles