कोथरुडमधील गोळीबाराप्रकरणी मकोका कारवाईनंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ हा परदेशात पसार झाला आहे. आता त्याचा भाऊ सचिन घायवळ याला बंदुकीचा परवाना मिळाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्यावरून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे.सुषमा अंधारे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिसांनी गंभीर गुन्हे, खुनाचा प्रयत्न आणि मोक्कासारखे कलम दाखल असलेल्या व्यक्तीला परवाना देऊ नये असा अहवाल दिला आहे. मात्र योगेश कदम यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत सचिन घायवळला हा विशेष परवाना दिला आणि एका गुंडाला बळ पुरवले. या कृतीमुळे योगेश कदम यांना गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला, असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
कुख्यात गुंड निलेश घायवळ याला बंदुकीचा परवाना, गृहराज्यमंत्री योगेश कदम मोठ्या अडचणीत…..
- Advertisement -


