राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. यानूसार आता सर्व शाळांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा संघ समिती तयार करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या संघाच्या माध्यमातून संबंधीत शाळेच्या गुणवत्तेसह भौतिक सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने 1 ऑक्टोबरला काढण्यात आले आहेत. यात शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे. शाळेतून मिळालेले ज्ञान, संस्कार व मूल्यांवरच विद्यार्थ्यांचा पुढील जीवन प्रवास उभा राहतो. जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खासगी शाळांतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासन, समाजकारण, राजकारण, संशोधन, व्यापार, शेती, उद्योग क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत असल्याचे राज्यभरात दिसून येते. यासोबतच राष्ट्र उभारणीसाठीही योगदान देत आहेत. या सर्व बाबींचा विचार करता, राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच खाजगी शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व शाळांमध्ये (इयत्ता 1 ली ते 12 वी) शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात यावा. यासाठी पुढील मार्गदर्शक तत्त्वे व कार्यसूची निश्चित करण्यात यावी, असे आदेश काढण्यात आले आहेत.
यात संघाचे नाव आणि संघ समितीची रचना यात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी (पुरुष/स्त्री) राहणार आहेत. तसेच सचिवहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक-प्राचार्य. कोषाध्यक्ष सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी तर सदस्य : स्थानिक व नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी आणि सल्लागार सदस्य शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक असणार आहेत. संबंधीत संघाचे सदस्य हे संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी नोंदणी (ऑनलाईन /ऑफलाईन) करून संघाचे सभासदत्व घेऊ शकेल. याबाबतची नोंदणी प्रत्येक शाळेत शासनाने पुरविलेल्या ऑनलाईन प्रणालीवर माजी विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करता येणार आहे. या माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात येणार आहे.
 शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेऊन माजी विद्यार्थी शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्त्वाचा हातभार लावत असतात. या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते. माजी विद्यार्थी शाळा विकासासाठी विविध प्रकारे मोलाचे योगदान करीत असतात. अशाप्रकारची उदाहरणे अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आढळून आली आहेत.



Shrikant malhari gayke