महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पत्रके भिरकवणाऱ्या आरोपी मागील मास्टरमाइंडचा शोध घ्या– सकल आंबेडकरी समाजाची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलावरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी आक्षेपार्ह पत्रके फेकण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली होती.
आंबेडकरी समाजाच्या प्रतिनिधींनी तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून निषेध नोंदविला होता. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत केवळ २४ तासांच्या आत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
तथापि, आरोपीच्या मागे कोणाचे तरी मोठे डावपेच असावेत असा संशय सकल आंबेडकरी समाजाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर समाजाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेट देऊन आणि पत्रकार परिषद घेऊन या घटनेमागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंबेडकरी समाजाचे म्हणणे असे की, शहरातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक सौहार्द बिघडवून शहरात दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे. म्हणूनच या घटनेमागील मास्टरमाइंडचा पर्दाफाश होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या विघातक प्रवृत्तींना आळा बसेल व यावेळी उपस्थिततानी एकमुखाने सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफी नाही. अशा प्रवृत्तींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे.” त्यामुळे त्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यावेळी सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजराव साळवे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, सिद्धार्थ आढाव, विशाल कांबळे, योगेश थोरात, गौरव साळवे, समिर भिंगारदिवे, सागर ठोकल, विशाल गायकवाड, तुकाराम गायकवाड, सिद्धांत दाभाडे आदी उपस्थित होते.
महापुरुषांबद्दल आणि आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी आक्षेपार्ह पत्रके; आंबेडकरी समाजाची मोठी मागणी काय?
- Advertisement -


