अक्षय कर्डिले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी
कारवाई न झाल्यास डीएसपी चौकात रास्तारोकोचा इशारा
पोलीस अधीक्षकांना पदाधिकाऱ्यांचे निवेदन
अहिल्यानगर : भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी संदीप कर्डिले, गोविंद वाघ, रभाजी सुळ, अनिल कराडे, रावसाहेब कर्डिले, दत्ता तापकिरे, संभाजी पालवे, राहुल पानसरे, सागर बनकर, यशवंत पानमळकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा सर्वे करण्यात येत आहे. या सर्वेसाठी ७९७१७५३३५२ व ७९७१८३१०६० या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला आहे. या क्रमांकांवरून मतदारसंघातील अनेक मतदारांना व्हॉईस कॉल आले होते.
मात्र या दोन्ही क्रमांकांच्या ट्रूकॉलर आयडीवर लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या नावाने अतिशय आक्षेपार्ह मजकूर टाईप करण्यात आला असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून यामुळे मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. या प्रकारामागील संबंधित व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच राहुरी, नगर व पाथर्डी तालुक्यातील गावागावातील वातावरण दूषित होणार नाही यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, येत्या दोन दिवसांत संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास स्वर्गीय आमदार कर्डिले यांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता डीएसपी चौक, अहिल्यानगर येथे तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.


