Saturday, February 21, 2026

Ahilyanagar crime news :शेतीच्या वादातून एकावर पहारीने वार; उपचारादरम्यान मृत्यू

नेवासा -तालुक्यातील देडगाव येथे शेतीच्या वादातून डोक्यावर पहारीने वार करुन एकास गंभीर जखमी केल्याची घटना घडली. घटनेनंतर या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान उपचार घेत असतानाच सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे खूनाचा गुन्हा दाखल झाला. याबाबत नेवासाफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले गोरक्षनाथ आदिनाथ बनसोडे (वय 33) धंदा-शेती रा. देडगाव ता. नेवासा यांनी दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की, मी माझे वडिल आदिनाथ बनसोडे, आई मिराबाई बनसोडे, पत्नी काजल बनसोडे, अपत्य कृष्णा बनसोडे यांचेसह बनसोडे वस्ती, देडगाव ता नेवासा येथे रहाण्यास असून शेतीचा व्यवसाय करून आम्ही आमचे कुटुंबाचा उदर्निवाह करतो.

माझे घराशेजारी माझा चुलत भाऊ चंद्रकांत आसाराम बनसोडे हा त्याचे पत्नी सविता बनसोडे, मुलगा बबलू उर्फ रोहित बनसोडे यांचेसह रहाण्यास आहे. मागील अंदाजे पाच वर्षापासून माझे वडिलांचे नावे असलेल्या देडगाव येथील शेत गट क्रं. 425/1 वरुन आमचेत वाद सुरु आहेत. तहसीलदार नेवासा यांचे आदेशाने सदर शेतीचा रस्त्याबाबतचा निकाल आमचे बाजुने लागलेला आहे. परंतू चंद्रकांत बनसोडे यांनी शेतजमीन त्यांना वाटणीमध्ये कमी मिळाली म्हणून नेहमी माझेशी व माझे कुटुंबासोबत वाद व शिवीगाळ करत असे. प्रत्येक वेळी मी व माझे वडिलांनी चंद्रकांत व त्याचे मुलास शेतजमीन मोजणी करण्याबाबत समजावून सांगत असे. परंतू वेळोवेळी चंद्रकांत त्याचे कुटुंबासह आम्हांस त्रास देत असे.9 जून रोजी 11ः30 वाजण्याच्याचे सुमारास मी माझ्या कुटुंबासह घरी असताना तेथे चुलतभाऊ चंद्रकांत आला असता त्यास आमचे शेतामध्ये तू मकाची पेरणी का केलीस? असे मी व माझे वडिल घरासमोरील अंगणात विचारपूस करत असताना चंद्रकांत याचा मुलगा रोहित हातात लोखंडी पहार घेवून पळत आला व त्याने काहीएक विचार न करता माझे वडील आदिनाथ बनसोडे यांचे डोक्यात पहारीने वार करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चंद्रकांत याने मला धरुन हातातील विटेने माझे डावे डोळ्यावरील भुवईवर भारुन दुखापत केली. सविता बनसोडे भांडण ठिकाणी आली असता तिने मला लाथाबुक्क्याने मारहाण करुन यांना आज जीवे ठार मारा, सोडु नका असे म्हणून शिवीगाळ केली. आमचे भांडण बघून आमचे घराशेजारी रहाणारे भाऊसाहेब बनसोडे, माझी पत्नी काजल बनसोडे, आई मिराबाई बनसोडे यांनी मध्ये पडून मला व माझे वडिलांना भांडणातून सोडवले.

आरडा-ओरडा ऐकून चंद्रकांत व त्याचा मुलगा रोहित, त्याची पत्नी सविता बनसोडे हे तेथून पळुन गेले. माझे वडिलांचे डोक्यातून रक्त येत असल्याने व ते बेशुध्द झाल्याने मी जखमी अवस्थेत आमचे गावातील अ‍ॅम्बुलन्सला कॉल करुन बोलावले व मी, माझे वडील आदिनाथ बनसोडे व नातेवाईकांसह ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे आलो. तेथील डॉक्टरांनी माझे वडिलांवर उपचार करुन अहिल्यानगर येथे उपचारासाठी पाठविले. मी जखमी असल्याने नेवासा फाटा येथील डॉ. पाटील शिवसंगीता हॉस्पीटल नेवासा फाटा येथे उपचारा करीता दाखल झालो तसेच माझे वडिलांना पुढील उपचारा करीला मॅक्सकेअर हॉस्पीटल अहिल्यानगर येथे दाखल केले. या फिर्यादीवरुन चंद्रकांत आसाराम बनसोडे, सविता चंद्रकांत बनसोडे व रोहित चंद्रकांत बनसोडे यांच्यावर गुन्हा रजिस्टर नं. 581/2025 भारतीय न्याय संहिता कलम 109, 118(1), 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान जखमी आदिनाथ बनसोडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हत्येचा वाढीव गुन्हा नोंदवण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles