अहिल्यानगर -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुतीबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे. यामुळेच भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू आहे. नुकताच अकोलेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुनीता भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे आनंदच आहे. लवकरच नगर जिल्ह्यातील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून त्यांच्याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री निर्णय घेतील. सक्षम आणि जनमत असणारे नेते महायुतीत घेण्यात वावगे नाही, असे मत भाजप नेते माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.नगरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर डॉ. विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमितता विरोधात मुंबईमध्ये विरोधी पक्षांकडून शनिवारी काढण्यात आलेल्या मोर्चावर डॉ. विखे यांनी जोरदार टीका केली. हा मोर्चाच हास्यास्पद आहे. लोकसभेमध्ये माझा पराभव झाला. त्यावेळेसही तीच मतदार यादी होती. आता विधानसभे वेळेस त्यांचा पराभव झाला, त्यामुळे या मतदार यादीवर आक्षेप घेणे ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला माहिती असून हे उद्या जर पराभूत झाले, किंबहुना ते होणारच आहेत. त्यासाठी ते आधीच असे कारण शोधून ठेवत आहे, असा खोचक टोला डॉ. विखे यांनी विरोधकांना लगावला. येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे. आपण पडणार आहोत, त्यापूर्वीच विरोधकांनी आपले भाषण तयार करून ठेवलेले आहे. त्यांचा आजचा मोर्चा ही गोष्ट सिद्ध करून जाते की येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये त्यांचा पराभव हा त्यांना स्पष्टपणे दिसत आहे, असा दावा डॉ. विखे यांनी यावेळी केला.
जिल्ह्यात ऑपरेशन लोटसची चर्चा होत आहे. यावर बोलताना डॉ. विखे म्हणाले, अनेक लोक महायुतीतील विविध घटक पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. महायुतींच्याद्वारे जनतेचा विकास होत आहे, म्हणून लोकांचे प्रवेश होत आहे त्यामुळे यात गैरकाही नाही. अनेक बडे नेते देखील भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेसमध्ये होतो, त्यानंतर भाजपात आलो. मला जनतेने खासदार केले, राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभेला निवडून दिले. यावरून तुमचे कामच तुमची ओळख असते. यामुळे चांगल्या लोकांचे महायुतीत स्वागत असल्याचे डॉ. विखे म्हणाले.
राजमुळे महायुतीच्या जागा वाढणार
राज ठाकरे आघाडीमध्ये सहभागी झाल्याने महायुतीच्या जागा अधिक वाढतील, अशा शब्दात डॉ. विखे यांनी शाब्दिक चिमटा काढला. राज ठाकरे यांच्या पक्षाने काही वेगळे मुद्दे मांडून काही जनमतातून त्यांना काही मिळालं, असे वाट नाही. यापूर्वीही जनतेने मनसेला संधी दिली होती. त्यांच्या माध्यमातून काम होत नाहीते, हे जनतेला समजल्यानंतर जनतेने पुन्हा त्यांना संधी दिली नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले किंवा राज ठाकरे आघाडीत गेले त्यामुळे महायुतीचेच उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील असा विश्वास डॉ. विखे यांनी व्यक्त केला.
ऑपरेशन लोटसऐवजी मी डॉक्टर असल्याने मी माझ्या पध्दतीने ऑपरेशन करतो. ऑपरेशन लोटस हा राजकीय शब्द आहे. माझे ऑपरेशन हे वेगळे असतात. ऑपरेशन लोटस अंतर्गत कोणत्याही पक्षाला आम्ही टार्गेट केलेले नाही, असे डॉ. विखे म्हणाले. आम्ही काँग्रेसचे लोक घेणार नाही. कारण काँग्रेस हा संपलेला पक्ष असून त्यांना आमच्या सोबत घेऊन आम्हाला आमचा पक्ष संपवायचा नाही, अशी आमची भूमिका आहे असेही यावेळी डॉ. विखे म्हणाले.


