अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

अहिल्यानगर, – भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि. ३० व ३१ मार्च, २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच दि. १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना, वीजा चमकणे किंवा वादळी वारे असताना झाडाखाली उभे राहू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये व विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांजवळ थांबू नये. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) परिसरात थांबणे टाळावे. वीजा चमकत असताना उघड्यावर असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा.

धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये; धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.
शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी.बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ अथवा २३५६९४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles