आशिया चषकात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन टाळल्यानंतर आता पाकिस्ताननेही टोकाचे पाऊल उचललं आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून अर्थात आशिया चषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफ्रीवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानातील जिओ न्यूजने दिलं आहे.
आशिया चषक 2025 मध्ये रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला होता. या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला होता. मात्र, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे भारतीय खेळाडूंनी सामना संपल्यानंतर हस्तांदोलन केलं नव्हतं. त्यामुळे पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतली असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानी संघ 6 वाजता हॉटेलमधून स्टेडियमकडे जाण्यासाठी निघणे अपेक्षित होतं. पण पाकिस्तानी संघ बाहेर निघालेलाच नाही. पाकिस्तानी संघाच्या बॅगा बसमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पीसीबीने संघाला वाट पाहण्यास सांगितले आहे. पीसीबी लवकरच लाहोरमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत पत्रकार परिषद घेऊ शकतं.आशिया चषकात आज पाकिस्तानचा सामना युएईशी होणार होता. मात्र, त्यापूर्वीच पाकिस्तानने माघार घेतली आहे. त्यामुळे आता सुपर फोरचं तिकिट युएईला मिळणार आहे.
पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतल्याने युएईला 2 गुण मिळतील, त्याचे एकूण 4 गुण होतील आणि ते ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येईल. पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल आणि युएई सुपर-4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल. दरम्यान, यानंतर आता आयसीसीकडून पाकिस्तानवर मोठी कारवाई देखील केली जाऊ शकते.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सामना रेफरी अँडी पायकॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यावर चर्चा देखील करत होती. पीसीबीने या मागणीसाठी दुसरे पत्रही आयसीसीला पाठवले होते. मात्र, दबावाखाली येऊन सामना अधिकाऱ्याला बदलण्याचा पायंडा पडू नये म्हणून आयसीसी या मागणीस मान्यता देण्यास तयार नाही, अशी माहिती समोर येत आहे.


