राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या महापालिकांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी युती आणि आघाडी केल्याचं दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांच्या राज्यभरात रॅली, मेळावे सभा सुरू आहेत.
या घडामोडी सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी एका सभेत बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकली आहे’, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“परळी एवढंच प्रेम मी माळाकोळीवर देखील करते. उलट आता परळीवर धनुभाऊंना प्रेम करू द्या, मी त्यांना परळी देऊन टाकली आहे. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. मी त्यांना (धनंजय मुंडे यांना) म्हटलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळाकोळीवर प्रेम करते आणि माळाकोळी आमच्यावर परळीपेक्षा कणभर जास्त प्रेम करेल”, असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.“गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारी माणसं पश्चिम महाराष्ट्रात आहेत, उत्तर महाराष्ट्रात आहेत, विदर्भात आहेत, कोणकणात आहेत, असा माणूस कुठेही नाही जो गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करत नाही”, असंही पंकजा मुंडे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाची परळीत एकहाती सत्ता राहिली. मात्र, धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून परळीत राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचं दिसून येतं. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलले आणि राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाली. त्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील एकत्र आले. मात्र, असं असलं तरी आगामी निवडणुकीत परळीतून नेमकं कोण लढणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. असं असतानाच आता पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.


