पतीच्या अपघाती मृत्यूमुळे नैराश्यग्रस्त पत्नीने मुलीसह आपल्या शेताजवळील तलावात उडी घेत आत्महत्याकेली. ही घटना 1 ऑगस्टला पहाटे 1.30 च्या सुमारास पारनेर तालुक्यातील कन्हेर ओहळ परीसरात उघडकीस आली. सुरेखा दत्तात्रेय औटी (वय 42) व शिवांजली दत्तात्रेय औटी (वय 21) अशी माय-लेकींची नावे आहेत. सुरेखा यांचे पती दत्तात्रेय औटी यांचे पारनेर रस्त्यावरील अपघातात 6 महिन्यांपूर्वी निधन झाले होते.पारनेर शहरातील रहिवासी सुरेखा व शिवांजली नेहमीप्रमाणे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतीत काम करण्यासाठी 31 जुलै सकाळी 11 वाजेच्या सुमारास गेल्या होत्या. त्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत काम केले. काम संपवून घराकडे परतण्याऐवजी त्यांनी शेताजवळील तलावात उडी घेऊन जीवन संपवले. सायंकाळी 7 वाजून गेल्यावरही आपली आई व बहीण घरी न परतल्याने सुरेखा यांचा मुलगा तेजसने, शेताजवळ वास्तव्यास असणार्या चुलत्यांशी संपर्क साधून आई व बहीण घरी आल्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी, शेजार्यांनी दोघींचा शोध सुरू केला.
परंतु शोध न लागल्याने रात्री 11 वाजता पारनेर पोलिस ठाण्यात दोघी हरवल्याची फिर्याद दाखल केली. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस पथकाने सुरेखा यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता तलावाजवळ मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून पोलिस व नातेवाईकांनी तलावाच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री दीड वाजता सुरेखा यांची पिशवी व त्यातील मोबाईल तलावाच्या काठावर आढळून आले. तेथून जवळच असलेल्या तलावाच्या डोहात सुरेखा व शिवांजली यांचे मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.


