२६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी आयोगाला पत्र पाठवले. पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवली. सुनेत्रा पवारांकडून फक्त १४ पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये जय पवार यांचेही नाव आहे. पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा उल्लेख आहे. खजिनदार म्हणून शिवाजीराव गरजे यांचा उल्लेख आहे. तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, सना मलिक, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे. सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, त्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता जय पवार यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली. पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील.


