भोंदू खरातच्या अटकेचं ऑपरेशन कसं राबवलं? काही नेत्यांचीही चौकशी होणार! पोलीस आयुक्तांनी उलगडला थरार

राज्यात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीद्वारे केली जात आहे. या चौकशीत दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
दरम्यान, अशोक खरातला जेव्हा अटक केली तेव्हा नेमकं काय घडलं? पोलिसांनी भोंदू अशोक खरातच्या अटकेचं ऑपरेशन नेमकं कसं राबवलं? याचा संपूर्ण थरारक घटनाक्रम नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी संदीप कर्णिक यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

अशोक खरातला नेमकं अटक कशी केली? यावेळचा घटनाक्रम सांगताना संदीप कर्णिक म्हणाले की, “अशोक खरातच्या अटकेचं ऑपरेशन होतं ते अतिशय गुप्त होतं. तसेच अशोक खरातचे जे भक्तगण आहेत ते सर्वच क्षेत्रात पसरलेले आहेत. त्यामुळे जर हे ऑपरेशन लीक झालं असतं तर आरोपी पळून गेला असता. त्यामुळे आरोपीला कुठलीही गोष्ट न समजू देता हे ऑपरेशन यशस्वी करणं हे एक आव्हान होतं. यामध्ये पहिला टप्पा होता की तक्रारदारांना विश्वासात घेणं. कारण महिला तक्रारदारांना विश्वासात घेऊन एफआयआर घेणं हे एक मोठं काम असतं. अशोक खरातच्या अटकेच्या प्रकरणाचं ऑपरेशन हे पोलीस खात्यात खूप मोजक्या लोकांनाच माहिती होतं”, असं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटलं आहे.
“११ वाजताच्या दरम्यान आरोपी घरीच असल्याची खात्री करून आणि घराच्या आजूबाजूला त्याचं लोकेशन पाहून कारवाई केली. मात्र, आधी आमची खात्री होत नव्हती की आरोपी घरीच आहे नाही. पण आम्हाला एवढं माहिती होतं की आरोपी हा याच परिसरात आहे. आरोपी जर पळाला असता तर वेगवेगळ्या माध्यमातून त्याने प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला असता”, असं संदीप कर्णिक यांनी म्हटलं आहे.
“आमच्या पोलीस अमलदारांनी त्या ठिकाणी चोर आल्याची अफवा पसरवली आणि ते चोर घरात घुसलेले आहेत. त्यामुळे ते चेक करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि मग घराची तपासणी केली असता आरोपी आम्हाला एका रुममध्ये मिळाला. त्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली. साधारण ९ वाजल्यापासून आमच्या टीम त्या ठिकाणी वावरत होत्या. पण जेव्हा कारवाई केली तेव्हा शेवटी १५ मिनिटांत ऑपरेश राबवण्यात आलं”, अशी माहिती संदीप कर्णिक यांनी दिली.

अशोक खरात प्रकरणात काही नेत्यांनी चौकशी होऊ शकते का? या प्रश्नावर बोलताना संदीप कर्णिक म्हणाले की, “जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा खरातबरोबर फक्त फोटो आहे म्हणून त्या व्यक्तीवर संशय घेऊ शकत नाहीत किंवा म्हणून त्या व्यक्तीला आपण आरोपीच्या कटघरात उभं करू शकत नाहीत. मात्र, तपासात जर एखादी लिंक आली किंवा असा संशय आला की एखादा व्यक्ती यामध्ये सहभागी असू शकतो तर नक्कीच एसआयटी कोणाचीही गय करणार नाही, तशा गृहमंत्र्यांच्या आणि पोलीस महासंचालकांच्या सूचना देखील आहेत. कायद्यासमोर सर्वजण समान असतात”, असं सूचक भाष्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles