अहिल्यानगर-डांगे गल्ली येथील गुजराथी लॉजमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर कोतवाली पोलिसांनी 26 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास छापा टाकत लॉज चालकासह 7 जणांना ताब्यात घेतले. तसेच या ठिकाणी असलेल्या 3 महिलांची सुटका करण्यात आली. माणिक चौकाजवळ असलेल्या डांगेगल्ली येथील गुजराथी लॉजमध्ये कुंटणखाना चालविण्यात येत असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथक नेमून कारवाईचे नियोजन केले.
मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी अगोदर तेथे बनावट ग्राहक पाठवण्यात आला. त्या बनावट ग्राहकाने तेथे जाऊन मावा खाऊन थुंकण्याच्या बहाण्याने पुन्हा बाहेर येऊन पोलिसांना इशारा केला. त्याच्याकडून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री होताच पोलिसांनी अचानक छापा टाकून काउंटरवर बसलेला इसम राजेंद्र प्रमोद अल्हाट (वय 43, रा. माधवनगर, केडगाव) यास ताब्यात घेतले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे करीत आहेत.


