पूजा खेडेकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज पूजाची चौकशी केली. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ती म्हणाली, “मी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून सांगितलं होतं की मी पोलीस व न्यायालयाला पूर्ण सहकार्य करेन. न्यायालयाने माझा जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मी आज चौकशीला हजर झाले होते.”
दरम्यान, यावेळी पूजाला तिच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आले. तिने खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आणि १२ वेळा यूपीएससी परिक्षा दिल्याचा आरोप केला जात होता. त्यावर ती म्हणाली, “मला सर्वांसमोर स्पष्ट करायचं आहे की प्रसारमाध्यमं व शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत चुकीची माहिती पसरवली जात आहे. अनेक वेळा परिक्षा दिली, नाव बदललंय, खोटं प्रमाणपत्र वगैरे हे सगळे आरोप खोटे आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईच्या नावाचा समावेश केला आहे. आपल्या देशात नावापुढे आईचं नाव लावणं हा कधीपासून गुन्हा झाला आहे? माझ्यावर झालेल्या आरोपांचं मला आश्चर्य वाटतंय. अनेक वेळा नाव बदलल्याचा आरोप चुकीचा आहे.”
पूजा खेडेकरवर आरोप आरोप केला जात आहे की तिने वेगवेगळ्या नावाने अर्ज करून यूपीएससी परिक्षा दिली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना पूजा म्हणाली, “कुठेही गेलात तर तुम्ही तुमचं पहिलं आणि शेवटचं नावच सांगणार. मी देखील माझं नाव पूजा खेडेकर असंच लिहिते. जिथे पूर्ण नाव लिहायचं आहे तिथे पूजा दिलीप खेडेकेर लिहिते. महाराष्ट्रात एखाद्याचं नाव दिलीप असेल तर त्याचं नाव दिलीपराव देखील लिहिलं जातं. याचा अर्थ ती दोन वेगवेगळी माणसं नसतात. काहीजण मनाला वाटेल तसं या प्रकरणाला वळण देऊन बातम्या पसरवत आहेत. तसेच खोटं दिव्यांग प्रमाणपत्र व अनेक वेळा परिक्षा दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या सगळ्या गोष्टी तपासायला यूपीएससीचं स्वतंत्र पथक असतं, १० पेक्षा जास्त डॉक्टरांचं पथक त्यांच्याकडे आहे. त्या सर्वांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासलेली असते.”
माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी खेडेकर म्हणाली, “मी नाव बदलून परिक्षा दिल्याचा आरोप खोटा आहे. माझं नाव पूजा खेडकरच आहे. याच नावाने मी परिक्षा दिली आहे. माध्यमांना व सरकारी अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली गेली आहे. चुकीची माहिती पसरवली जात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या नावात आईचं नाव लावलं आहे. मग मी माझ्या नावात माझ्या आईच्या नावाचा समावेश केला असेल तर तो गुन्हा झाला का?”


