पारनेर ‘वराळ हत्याकांड’ प्रकरणात प्रशांत वराळला जामीन ; या आहेत अटी

‘वराळ हत्याकांड’ प्रकरणात प्रशांत वराळला जामीन

विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कठोर अटींसह जामीन मंजूर

अहिल्यानगर : प्रतिनिधी

अहिल्यानगर येथील विशेष न्यायालयाने ‘संदीप वराळ हत्याकांड’ प्रकरणात आरोपी क्रमांक २ प्रशांत ज्ञानदेव वराळ याचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला आहे. विशेष प्रकरण क्रमांक ५६९/२०२० अंतर्गत हा आदेश २४ मार्च २०२६ रोजी मा.विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी दिला.

न्यायालयाने समतोल तत्त्वाचा आधार घेत, याच प्रकरणातील इतर सहआरोपींना मिळालेल्या जामिनाचा विचार करून वराळ यांनाही जामीन देण्याचा निर्णय घेतला.

हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम

२१ जानेवारी २०१७ रोजी पारनेर पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यानुसार, निघोज ग्रामपंचायत चौकात मयत संदीप वराळ व फिर्यादी रंगनाथ वराळ यांची भेट झाली होती. काही वेळानंतर गोडाऊनकडे जात असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी तलवार, कोयता आणि दगडांनी हल्ला करत पीडितावर गोळीबार केला. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेतही गोळीबार करण्यात आल्याचे आरोप आहेत. पूर्वीच्या वैमनस्यातून कट रचून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ॲड. परिमल फळे यांनी प्रशांत वराळ तर्फे केलेला युक्तीवाद

आरोपीचे वकिल ॲड. परिमल फळे न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, प्रशांत वराळ यांचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही. ते घटनास्थळी उपस्थित नव्हते, तसेच प्रशांत वराळ यांच्या विरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नसताना त्याला या गुन्ह्यात गोवलेले आहें. प्रशांत वराळ विरुद्ध केलेली मोका अंतर्गत केलेली कारवाई सुद्धा कायद्याला अनुसरून नाही. तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झाले आहे, तसेच, कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेता जामीन देण्याची मागणी करण्यात आली.

सरकारी पक्षाचा तीव्र विरोध

सरकारी वकिलांनी जामीनाला जोरदार विरोध करताना नमूद केले की,
हा अत्यंत गंभीर आणि नियोजित खून आहे
आरोपीविरोधात प्राथमिक पुरावे उपलब्ध आहेत. आरोपी बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता.
तसेच, एका आरोपीचा अजूनही शोध सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ

बचाव पक्षाने औरंगाबाद खंडपीठाच्या २२ डिसेंबर २०२२ च्या निर्णयाचा दाखला देत, समान परिस्थितीतील सहआरोपींना जामीन मिळाल्याचे निदर्शनास आणले.
न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य धरत, सद्य आरोपीची भूमिका देखील तत्सम असल्याचे नमूद केले.

न्यायालयाचे निरीक्षण

न्यायालयाने नमूद केले की,
आरोपीने उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात उपाययोजना सुरू ठेवली होती
त्यामुळे त्याच्या फरार असल्याचा मुद्दा ग्राह्य धरता येत नाही. सहआरोपींप्रमाणेच भूमिका असल्याने समतोल तत्त्व लागू होते.

जामिनाच्या अटी

न्यायालयाने २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करत विविध अटी घातल्या आहेत. साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, कोणत्याही व्यक्तीमार्फत साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पारनेर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी. आरोपींच्या वतीने ॲड. परिमल फळे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. साक्षी जाधव, ऍड शुभम राजुरकर ॲड. प्रतीक ढमढेरे, ॲड. आकाश पवार यांनी सहाय्य केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles