Friday, October 31, 2025

प्राथमिक शाळेतील शिक्षकाने घेतला गळफास; मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रावरून संस्थेच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी: मानवत तालुक्यातील मंगरुळ (बु.) येथील श्री. नृसिंह शिक्षण प्रतिष्ठान संचलित श्री. नृसिंह प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक सोपान उत्तमराव पालवे यांनी संस्थेच्या सचिवांनी फसवणूक केल्याचा गंभीर आरोपी करीत गुरुवारी (दि.१७) झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संस्थेच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परभणी तालुक्यातील पेडगाव शिवारात गुरुवारी सकाळी एका झाडास गळफास घेतलेल्या अवस्थेत पालवे यांचा मृतदेह आढळून आला. तेव्हा कुटूंबियांसह नातेवाईक व मित्र परिवारात एकच खळबळ उडाली. धावपळ करीत कुटूंबियांनी पालवे यांना त्या स्थितीत परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकार्‍यांनी पालवे यांना मृत घोषित केले. दरम्यान, पालवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका पत्रातून श्री. नृसिंह शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव बळवंत खळीकर यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे

आपण चार वर्षांपूर्वी प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी वीस लाख रुपये दिले. ४० टक्के अनुदान असलेल्या पदावर रुजू करून घेतो असे यावेळी संस्थेच्या सचिवांनी या शिक्षकास सांगितले. हे पैसे देण्यासाठी आपण स्वतःचे शेत विकले तसेच काही नातेवाईकांकडून पैसे जमा केले ते सर्व पैसे खळीकर यांना दिले. परंतु, या संस्थेने बनावट संच मान्यता व इतर बनावट कागदपत्रे सादर करुन २०१८-१९ च्या संच मान्यतेनुसार २० टक्के शालार्थ प्राप्त करीत वेतन चालू केले. मार्च २०२४ चे देयक सुध्दा २० टक्क्यावरुन थेट ६० टक्क्याने काढले मात्र त्यासाठी खळीकर यांनी आपल्याकडून पुन्हा पाच लाख रुपये जास्तीचे घेतले असे पालवे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मार्च २०२४ च्या बिलानंतर एप्रिल, मे आणि जूनचे बिल या संस्थेने काढलेच नाही. जुलै महिन्याचे देयक ६० टक्क्याऐवजी २० टक्क्याने काढले. जून पासून मार्च २०२५ पर्यंतचे २० टक्क्याचे देयक काढण्यासाठी माझ्याकडून वेतनानंतर अर्धे पैसे खळीकर यांनी उकळले, असाही आरोप पालवे यांनी या पत्राद्वारे केला.

संस्थेने केलेली ही शिक्षक भरती बोगस आहे. त्या बाबत आपण विचारणा केली असता खळीकर यांनी आपणास संस्थेतून काढून टाकण्याची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक व व्यवस्थापक यांच्यामार्फत विविध प्रकारे दबाव आणला असेही आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या पत्रात पालवे यांनी नमूद केले आहे. खळेकर यांनी आपणास बोलावून घेतले तसेच राजीनामा देण्याची सूचना केली. तुझे घेतलेले पैसेही परत करणार नाही असे ते म्हणाले. आपण साधारण कुटूंबातील आहोत, या फसवणूकीच्या विरोधात लढण्याचे सामर्थ्य आपणास नाही, त्यामुळे आपण कुठलाही पर्याय नसल्याने आत्महत्या करत आहोत, आपल्या पश्‍चात संस्थेच्या सचिवांना मृत्यूबद्दल जबाबदार धरावे व कुटूंबियांना संपूर्ण रक्कम व्याजासह द्यावी, अशी अपेक्षा पालवे यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. तसेच आपली आत्महत्या म्हणजे संस्था सचिवाकडून झालेला खून आहे असेही ते या पत्रात म्हणाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles