अहिल्यानगर-मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ‘अँक्यूम मसाज’ पार्लरवर अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत 5 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्पा मॅनेजर अनिकेत अशोक बचाटे आणि ग्राहक महेश सुंदराणी यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या ‘अँक्यूम मसाज पार्लरवर ११ डिसेंबर रोजी दुपारी करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुखयांना या स्पामध्ये मसाजच्या आडून बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी नियोजन करून एक बनावट ग्राहक स्पामध्ये पाठवला. बनावट ग्राहकाने सांकेतिक भाषेत संदेश दिल्यानंतर पोलिस पथकाने तात्काळ स्पावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान स्पामध्ये 5 महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात राबवले जात असल्याचे आढळून आले. स्पा मॅनेजर ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील निम्मी रक्कम स्वतःकडे ठेवत असल्याचे तपासात समोर आले आहे. पीडित महिलांची तत्काळ सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे
या कारवाईमुळे स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध धंद्यांवर अंकुश बसणार असून, पोलीस अधीक्षक कार्यालयाने अशा अनैतिक मानवी वाहतुकीच्या विरोधात कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


