नगर जिल्हा मजदूर सेनेच्या नेतृत्वाखाली व्हिडिओकॉन कंपनी गेटवर आंदोलन ८ दिवसांत पगार न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा
व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा थकीत पगार तातडीने द्या – बाबूशेठ टायरवाले
अहिल्यानगर : बुऱ्हानगर येथील व्हिडिओकॉन कंपनीत काम करणाऱ्या ३२ कामगारांचा मार्च 2018 पासून नोव्हेंबर 2023 पर्यंतचा पगार थकीत असून, त्या पगारासाठी अखेर नगर जिल्हा मजदूर सेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला व औद्योगिक न्यायालयात याविषयी दावा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणात कामगारांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकारी यांना कामगारांचा थकीत पगार व्याजासह रु. 3 कोटी 75 लाख 85 हजार 140 इतकी रक्कम तातडीने अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा मजदूर सेनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली व्हिडिओकॉन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी बाबूशेठ टायरवाले यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “कामगारांनी ८ वर्षे संयमाने वाट पाहिली आहे. आता न्यायालयाचा आदेश आहे, तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत असेल तर ८ दिवसांनंतर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल. याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.यावेळी विद्या पवार, आरती बागडे, सुनिता तेलधुणे, सपना भिंगारदिवे, शैला रासने, सुनीता चक्रे, बिजला लांडे, विजया धुमाळ, अनिल झावरे, पाराजी पानसंबळ, नितीन गांधी, रवींद्र कुदळे, आप्पा पाटील, संजय राजुरकर, लक्ष्मण लोखंडे, अनिल पंकज, साहेबराव गायकवाड, अतुल पानसरे आदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(चौकट) व्हिडिओकॉन कंपनीची 36 एकर मालमत्ता बँकेच्या ताब्यात गेल्यानंतर तिचा लिलाव करण्यात आला असून त्या मालमतेची खरेदीही झाली आहे. मात्र एवढं सगळं होऊनसुद्धा कामगारांना त्यांचा न्याय मिळालेला नाही. बाबूशेठ टायरवाले यांनी यावेळी अशीही मागणी केली की, “कामगारांचा पगार देईपर्यंत झालेली मालमतेची खरेदी रद्द करण्यात यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी कामगार न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून कामगारांचा थकीत पगार अदा करावा, अन्यथा नगर जिल्हा मजदूर सेना अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.


