महसूल विभागात खळबळ! प्रांत अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला २ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

पुणे जिल्ह्यातील जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमध्ये शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील एका लिपिकालाही ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेमुळे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीचे ‘बिल्डिंग कम्प्लेशन सर्टिफिकेट’ म्हणजेच बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. हा महत्त्वपूर्ण दाखला देण्यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.

तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, शिंदे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालय परिसरात एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची रोकड स्वीकारताना गोविंद शिंदे आणि त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला पथकाने जाळ्यात पकडले. रंगेहात पकडल्यानंतर या दोन्ही आरोपींना तातडीने ताब्यात घेण्यात आले.

गोविंद शिंदे यांच्या कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमीमुळे या कारवाईची अधिकच चर्चा होत आहे. शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अकोले येथील अगस्ती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांचे जावई आहेत. जुन्नर येथे नियुक्त होण्यापूर्वी शिंदे शिर्डी येथे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. शिर्डीतील त्यांच्या कार्यकाळातही त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे.

या लाचखोरीच्या प्रकरणामुळे जुन्नर आणि आंबेगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीच्या पथकाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करून सखोल चौकशी सुरू केली आहे. मंचर पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा नोंदवण्यात आला असून, लाच प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. महसूल विभागातील एका बड्या अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात स्वच्छ प्रतिमेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटद्वारे केली जात असून, दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles