पुणे : मार्केटयार्ड परिसरातील गुलमोहर सोसायटीमध्ये सुरू असलेल्या वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाने नुकताच छापा टाकला. यावेळी अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला असून आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत सहा तरुणींची सुटका करण्यात आली असून, हे मसाज सेंटर चालवणाऱ्या महिला मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध पथकाकडून ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांना मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्याच्या मदतीने संयुक्त पथक तयार करण्यात आले. त्यानंतर अचानक छापा टाकत अवैध धंदा उघडकीस आणण्यात आला.
या प्रकरणी पोलीस हवालदार आश्रुबा मोराळे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या मुलींना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची समुपदेशनासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.


