सकाळी लवकर उठून कार्यक्रमांना सुरुवात करण्याची सवय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. परंतु गुरुवारी कार्यक्रमाच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच अजित पवार यांनी उद्घाटन केले. त्यासाठी कार्यक्रमाचे आमंत्रण दिलेल्या भाजप खासदार येण्याची वाट त्यांनी पाहिली नाही. त्यामुळे भाजप खासदाराने जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. \
कार्यक्रमांची वेळ ही सकाळी 6.30 ठरवलेली होती. त्यापूर्वीच त्यांनी पुणे येथे परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमास भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनाही बोलवण्यात आले होते. परंतु त्यांची वाट न पाहता उद्घाटन झाल्याने त्यांची थोडी चीड चिड झाली. त्यामुळे अजित पवार यांनी लवकर उद्घाटन केल्याबद्दल माफी मागतो, असे सांगत पुन्हा एकदा उद्घाटन केले.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या कामाची पद्धत मला आवडते. आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे. मात्र, नियोजित वेळेआधी उद्घाटन होवू नये, ही दादांना विनंती आहे. मी नियोजित वेळेपूर्वीच कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. मात्र त्या आधीच उद्घाटन झाले होते. दहा मिनिटे आधी उद्घाटन झाले होते, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या की, माझी दादांना विनंती आहे. रात्रीची किंवा दिवसाची कुठली ही वेळ द्या. पण एक वेळ घोषित करा. प्रोटोकॉल नुसार ज्यांना, ज्यांना आमंत्रण दिले ते सर्व येणार असतात. यामुळे वेळेआधीच उद्घाटन करु नये. आपण कधी रेल्वे, बस किंवा फ्लाईट पकडण्यासाठी वेळेवर जातो. परंतु वेळेपूर्वीच ते निघून गेल्यावर वाईट वाटते. तसा हा प्रकार आहे. पुण्यात मी एकच ब्राम्हण खासदार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मी नक्की काम करेल.


