निमगाव वाघा शिवारात पाइपलाइनच्या किरकोळ वादातून दोन गटात राडा झाल्याची घटना सोमवार दि. ८ सप्टेंबर रोजी घडली. तलवार, कोयता, चाकू, लोखंडी रॉड व लाकडी लाठ्यांचा वापर करत हल्ला केल्याचा आरोप करत दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. हल्ल्यात सात ते आठ जण जखमी झाले असून, दोन्ही तक्रारींनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी दिलावर शेख यांनी फिर्याद दिली आहे. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता, पाइपलाइन फुटल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यानंतर छबू कांडेकर, राहुल कांडेकर व इतर आठ जणांनी तलवार, कोयता, लोखंडी रॉड व चाकूच्या सहाय्याने त्यांच्यासह नातेवाइकांवर हल्ला केला. हल्यात दिलावर शेख, अल्ताफ शेख, अरबाज शेख, इरफान शेख गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याच घटनेशी संबंधित छबूराव कांडेकर यांनी देखील फिर्याद दिली आहे. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाइपलाइनच्या दुरुस्तीवरून वाद झाल्यानंतर दिलावर शेख, अल्ताफ शेख यांच्यासह दहा जणांनी त्यांना लोखंडी रॉड व लाठ्यांनी मारहाण करत गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलाला व पुतण्यालाही जबर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. एस. व्ही. खरात, तपासी अंमलदार उगेश पतंगे करत आहे. दोन्ही फिर्यादींची सत्यता पडताळून आरोपांची चौकशी सुरू आहे.