अहिल्यानगर – दुकानातील दारू पिण्यासाठी दिली नाही म्हणून एका कामगाराने तरुणावर चाकूने वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव बायपास रोडवर २७ डिसेंबर रोजी रात्री १०.३० च्या सुमारास घडली. या चाकू हल्ल्यात ओंकार घनशाम गवळी (वय २२, रा. काष्टी, ता.श्रीगोंदा) हा जखमी झाला आहे.
याबाबत राजेश रमेश सातपुते (वय ३८, रा. बायपास रोड, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जखमी ओंकार गवळी हा त्यांच्या मामाचा मुलगा आहे. फिर्यादी सातपुते यांचे केडगाव बायपास रोडवर वाईन्स शॉप आहे. या दुकानात ओंकार गवळी हा काम पाहतो. दुकानात काम करणारा कामगार नेहूलकुमार प्रमोदकुमार ठाकूर (मूळ रा.समस्तीपूर, बिहार) याने त्यास दुकानातील दारू पिण्यासाठी मागितली.
मात्र ओंकारने ती दिली नाही. याचा त्याला राग आला आणि त्याने ओंकार वर चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी नेहूलकुमार याच्या विरुद्ध बीएनएस कलम १०९ (१), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पुणे बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी असताना एका महिलेचे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला आपल्या मुलाकडे पाथर्डी तालुक्यातील मिरी माका येथे कार्यक्रमासाठी आली होती. रविवारी (दि. २८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास जामखेडला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लांबवले याप्रकरणी कोतवाली पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अधिक तपास सुरू आहे. पोलीस प्रशासनाने प्रवाशांना बसस्थानक परिसरात दागिने व मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.


