राहुरी विधानसभा पोटनिवडणुक ;राष्ट्रवादीच्या भूमिकेने महाविकास आघाडीत आणखी गोंधळ

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीमध्ये आणखी गोंधळ पुढे आला आहे. आता आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) राहुरीची जागा पक्षाचीच असल्याचे सांगत येथे पक्ष चिन्हावर उमेदवार दिला जाईल, माजी आमदार प्राजक्त तनपुरे पक्ष चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार नसतील तर त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार दिला जाईल, पर्यायी उमेदवाराच्या नावासाठी उद्या,‌ रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्ष चिह्नावर उमेदवार राहुरीत दिला जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसने उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले होते तसेच ठाकरे गटानेही उमेदवारीचा दावा केला होता. काँग्रेस व ठाकरे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाले असतानाच आता पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्याची भूमिका घेतली गेल्याने महाविकास आघाडीतील गोंधळ आणखी उघड झाला आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे पक्षाचे नावावर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीत त्यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची भूमिका घेतली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पर्यायी उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे.

राहुरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे. गेल्या निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीकडे होती. माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवली होती. आता तनपुरे पक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत नसतील तर त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार दिला जाईल, पक्षाकडे त्यासाठी चार पर्यायी नावे आहेत, या नावांवर उद्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवेल, असे अंकुश काकडे यांनी सांगितले.

 

राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पक्ष कार्यालयात , शनिवारी आयोजित करण्यात आली होती. अंकुश काकडे यांच्यासह खासदार नीलेश लंके, दक्षिण जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, रावसाहेब मस्के, अरुण पाटील कडू, बाबासाहेब भोस, राजेंद्र कोठारी, अशोक बाबर, योगिता राजळे, नामदेव राऊत, सिताराम काकडे, किसनराव लोटके, अथर खान, नीलेश मालपाणी, विजयसिंह गोलेकर, बाळासाहेब हराळ, शिवशंकर राजळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles