Friday, March 13, 2026

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक, माजी मंत्री प्राजक्त तनपुरेच वक्तव्य ; डॉ. सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले …

अहिल्यानगर- अहिल्यानगर मनपा पदाधिकाऱ्यांच्या व सभापतींच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. अहिल्यानगर महानगर पालिकेवर भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने पूर्ण बहुमत मिळवत सत्ता राखली. यानिमित्त भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांनी आज पदाधिकारी सत्कार समारंभाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अहिल्यानगर मनपात पहिल्यांदा घोडेबाजार थांबल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

डाँ. विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगरमधील जनतेने भाजप व अजित पवार गटाला पूर्ण बहुमत दिले. मी व आ. संग्राम जगताप यांनी नगरकरांना जी आश्वासने दिली होती, त्यावर नगरकरांनी पूर्ण विश्वास ठेवला. आता आमची जबाबदारी वाढली आहे. सभापती निवडीतही यावेळी पहिल्यांदा घोडेबाजार थांबल्याचे दिसले. पहिल्यांदाच योग्य व्यक्तीला, योग्य खुर्ची मिळाली. आता नगरकारांना दिलेले शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री व नवीन उपमुख्यमंत्री आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. त्यांच्या माध्यातून निधी आणून शहराचा विकास साधला जाईल, असेही विखेंनी यावेळी स्पष्ट केले.

राहुरी विधानसभेबाबतही त्यांनी भाष्य केले. माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दोन दिवसांपूर्वी गुहा येथील कार्यक्रमात आपले सरकार असा दोनदा उल्लेख केला होता. शिवाय तुमचे 240 आणि आमचे 10 असे 250 आमदार सत्तेत आहेत, असंही वक्तव्य केलं होतं. याबाबत पत्रकारांनी डाँ. सुजय विखेंना विचारलं. त्यावरही डाँ. विखेंनी तनपुरेंची फिरकी घेतली. डाँ. विखे पाटील म्हणाले की, अगोदर शरद पवार गटाचे अजित पवार गटासोबत विलीनीकरण होईल, अशा चर्चा सुरु होत्या. आता शरद पवार गटाच्या थेट भाजपसोबत विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्यात. आता हे विलिनीकरण करण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाने तनपुरेंना दिला असेल तर मला माहित नाही. परंतु आमच्याकडून असा अधिकार फक्त मुख्यमंत्र्‍यांना आहे. राहुरी विधानसभेची जागा ही भाजपची आहे. भाजप हा सर्वे व जनमतावर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जो उमेदवार देतील, तो आम्ही निवडून आणू. आता कुणी काय बोलावं, हा ज्याचा-त्याचा अधिकार आहे. परंतु येथील आमदार भाजपचाच होणार, एवढंच मी सांगू शकतो, असं म्हणत त्यांनी तनपुरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. संग्राम जगताप व भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मुंबईत मुख्यमंत्र्‍यांची भेट घेतली होती. त्यामुळे डाँ. सुजय विखे यांच्या आजच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles