Wednesday, March 18, 2026

राहुरी पोटनिवडणुकीत नवा फॅक्टर! टपाल मतदानावर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडावी – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया*

​अहिल्यानगर, दि. १७: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नियुक्त सर्व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय राखत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

​जिल्हाधिकारी कार्यालयात राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ​यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपजिल्हाधिकारी भारती गायसमुद्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बढे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पवन टेंभुर्णीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “निवडणूक आयोगाच्या सुधारित नियमांनुसार यावेळी सर्व निवडणूक निरीक्षक (सामान्य, पोलीस व खर्च निरीक्षक) लवकर दाखल होत आहेत. त्यामुळे सर्व नोडल अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रे व खर्चाबाबतचा सर्व डेटा तातडीने अद्ययावत ठेवावा. आयकर आणि जीएसटी विभागाकडूनही आवश्यक माहिती त्वरित संकलित करावी.”

निवडणूक प्रक्रियेतील बदलांची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले , यावेळी मतदान प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, मतदान पथके थेट मतदान केंद्रांवर पोहोचतील. तर सेक्टर अधिकाऱ्यांमार्फत ईव्हीएम मशिन्स पोहोचवली जातील. यासाठी एसटी कार्गो बसेसचे नियोजन करावे. तसेच, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवडणूकविषयक प्रशिक्षणात ‘प्री-टेस्ट’ व ‘पोस्ट-टेस्ट’ अनिवार्य करण्यात आली असून, सूक्ष्म नियोजन करून ही सत्रे आयोजित करावीत.

राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३७४ मतदान केंद्रे असून २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना यावेळी टपाल मतदानाऐवजी ‘निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र’ दिले जाईल. टपाल मतदानाची सुविधा केवळ ‘होम वोटिंग’ आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राहील.

​उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर ‘किमान आवश्यक सुविधा’ अंतर्गत उन्हापासून संरक्षण, पिण्याचे पाणी, रॅम्प व स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी भरारी पथक , स्थिर सर्वेक्षण पथक व व्हिडीओ पाहणी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात ‘माध्यम कक्ष’ स्थापन करण्यात आला असून, पोलिसांच्या सायबर विभागाच्या मदतीने सोशल मीडिया मॉनिटरिंग केले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत निवडणूक प्रक्रिया, मतदान प्रक्रिया, मतदान केंद्र, कायदा व सुव्यवस्था, निवडणूकविषयक खर्च व्यवस्थापन, आदर्श आचारसंहिता, मनुष्यबळ, साधनसामुग्री, ईव्हीएम स्ट्रॉंग रुम, स्वीप, दिव्यांग मतदारांसाठी सुविधा यासह विविध कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles