राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत लढत कोणामध्ये रंगणार याच्या चर्चा झडत आहेत. सन २०२४ मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत पोटनिवडणुकीसाठी ८ हजार १७ मतदारांनी वाढ होऊन एकूण मतदार संख्या ३ लाख ३३ हजार १८३ झाली. त्या वेळी ७४.२७ टक्के म्हणजे २ लाख ४१ हजार ४०५ मतदान झाले होते. भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्राजक्त तनपुरे यांचा ३५ हजार ४८७ मतांनी पराभव केला होता.
cमाजी आमदार प्राजक्त तनपुरे यांची वक्तव्ये, भगवी टोपी, भगवे उपरणे अशा पेहरावातून त्यांच्या संभाव्य भाजपकडील वाटचालीच्या चर्चेनेही जोर पकडला आहे. तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी, कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना पाठबळ देण्याची भूमिका जाहीर केली. कर्डिले जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या संचालकपदाच्या रिक्त जागी अक्षय यांची नियुक्ती करण्यात आली. अक्षय कर्डिले यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री विखे यांनी अक्षय कर्डिले यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे सहानुभूतीचा फायदा भाजप घेण्याच्या प्रयत्न असल्याचे दिसते.


